25 हजाराच्या बिलासाठी 13 हजाराची लाच स्वीकारताना महावितरणच्या लिपिकाला रंगेहात अटक
:- याच्या पहिले लाच घेताना याच कार्यालयांतील कार्यकारी अभियंता अटकला होता
उदगीर :-पगारामध्ये घरभाडे भत्ता चालू करून एक वर्षातील रक्कम देण्यासाठी म्हणून 13 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या उदगीर येथील महावितरण विभागीय कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती ती अशी की तक्रारदाराचा घरभाडे भत्ता पगारामध्ये चालू करून एक वर्षाचे थकित घर भाड्याची रक्कम 25 हजार 192 रुपये साहेबांना सांगून पगारात जमा केली. परंतु त्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाच मागण्यात आली तडजोडीनंतर तेरा हजार रुपये माधव दगडोबा मुंढे (वय 35 वर्षे, पद- निम्न स्तर लिपीक, वर्ग-3,नेमणुक – महावितरण विभागीय कार्यालय, उदगीर, जि.लातूर ) याने स्वीकारले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या सापळ्यात तो रंगेहात सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार दराडे हे करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.