*कोरोंना रुग्णांना दिलासा, रेमडेसिव्हिरची किंमत निश्चित*
उदगीर - सिप्ला कंपनीने उत्पादित केलेल्या 100 मिलिग्रॅम रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा दर 2 हजार 282.88 रुपये निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्टर रेमडेसिव्हिर इंजेक्शनला प्राधान्य देतात. याबाबत वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत. त्यात हेट्रो आणि डॉक्टर रेड्डीच्या या कंपनीच्या एका इंजेक्शन वायलची किंमत 5 हजार 400 रुपये आहे. ज्युबिआर 4 हजार 900 आणि सिप्ला 4 हजार रुपये किंमत आहे. यापैकी सिप्ला कंपनीच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे.
कोरोना उपचारांसाठी अत्यावश्यक औषधांचे दर निश्चित करण्याचे आदेश सरकारने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिले होते. त्या आधारावर सिप्ला कंपनीतून उत्पादित होणाऱ्या रेमडेसिव्हिरचे दर निश्चित केले असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.