मान्सूनच्या परतीला सुरुवात- 9 अणि 10 ऑक्टोबर ला मराठवाड्यात पावसाची शक्यता. उदगीर : येत्या दोन ते तीन दिवसांत मुंंबई, ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरु झाला असून, मंगळवारी राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, मध्य प्रदेशाच्या काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
गेल्या २४ तासांतील माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ९ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १० ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.