लातूर जिल्हा बँकेकडूनदैनिक देशोन्नती वर खोटा गुन्हा दाखलउदगिरात पत्रकाराकडून निषेध : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
उदगीर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृ संस्था आहे या गोंडस नावाखाली संस्थेचे पदाधिकारी- अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पांढरपेशाना वेगळा आणि सर्व सामान्य शेतकरी, शेतमजुरांना वेगळी वागणूक देणाऱ्या बँकेचा गैरकारभार बँकेच्याच अधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे दैनिक देशोन्नतीने उघड केला. या द्वेषा तून बँक प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला. वास्तव लोकांसमोर आणणे हे माध्यमांचे काम आहे, या मुस्कटदाबीला आम्ही भीक घालणार नाही अशा शब्दांत निषेध व्यक्त करत उदगीर येथील पत्रकारांनी सदर गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध शाखांमध्ये मोठया प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू आहे, गैर प्रकारे पिककर्जाचे वाटप करण्यात येत असल्याचे बँकेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार दैनिक देशोन्नतीतून जिल्हा प्रतिनिधी विनोद उगिले यांनी गैर व्यवहाराचा पर्दापाश केला. दैनिक देशोन्नतीतून दैनंदिन प्रकाशित होत असलेली पर्दापाश मालिका बंद करावी यासाठी अनेक प्रकारे दबाव आणला गेला परंतू याला न जुमानता उगिले यांनी सदर सुरूच ठेवले, या द्वेषा तून सत्तेच्या बळावर दैनिक देशोन्नतीचे संपादक मा. प्रकाश पोहरे, लातूर जिल्हा प्रतिनिधी विनोद उगिले यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. एखाद्या गैरव्यवहाराचे वास्तव समोर आणणे हे माध्यम प्रतिनिधींचे कर्तव्य असते. अशा प्रकारे खोट्या तक्रारी दाखल करणे हे पत्रकारितेवरील घाला असून या मुस्कटदाबीना आम्ही भीक घालणार नाही,अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संबंधितावर कारवाई करण्यात यावी यासाठी उदगीर येथे पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनावर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सहसचिव श्रीनिवास सोनी सह पत्रकार बिभीषण मद्देवाड, भगीरथ सगर,सुनिल हवा, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, सुनिल मांदळे,महेश मठपती, रविंद्र हसरगुंसडे,ऍड सावनकुमार माने, विश्वनाथ गायकवाड, इरफान शेख, अशोक कांबळे, निवृत्ती जवळे,सचिन शिवशेटे, दत्तात्रय भोसले, ऍड अमोल कळसे, माधव रोडगे, भरतकुमार गायकवाड, अरविंद पत्की, संदीप निडवदे, प्रभूदास गायकवाड, अँड गोविंदा सोनी, महादेव घोणे आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.