*कार्तिकी एकादशीला रेल्वेची 'पंढरीवारी'* *14 नोव्हेंबर ला बिदर पंढरपूर रेल्वेची सोय* उदगीर : अनेक वर्षाची धार्मिक परंपरा असलेली कार्तिकी एकादशीची वारी कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षापासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे पंढरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासासाठी दक्षिण मध्य रेल्वेने सोय केली असून दि. 14 नोव्हेंबर रोजी बिदर ते पंढरपूर रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीला लाखो भाविक जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही वारी गेल्या दोन वर्षांपासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे वारकऱ्यामध्ये उत्साह निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसापासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या संपामुळे एस. टी. ची सेवा बंद असल्याने पंढरीच्या दर्शनासाठी जायचे कसे? हा प्रश्न वारकऱ्यासमोर उभा होता. कारण कोरोना चा प्रादुर्भाव, त्यातच अतिवृष्टी यामुळे सीमा भागातील वारकरी मोठया अडचणीत सापडला होता. त्यामुळे खाजगी वाहन करून जाणे या वारकरी बांधवांना परवडणारे नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन उदगीर रेल्वे संघर्ष समितीने केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य रेल्वे कडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून दक्षिण मध्य रेल्वेने खास वारकऱ्यांच्या सोयीसाठी बिदर पंढरपूर ही रेल्वे 14 नोव्हेंबर रोजी धावणार असल्याचे जाहीर केले आहे. ही रेल्वे दि. 14 नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री 10.30 वाजता निघणार असून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद मार्गे पंढरपूर ला 15 रोजी सकाळी 7 वाजता पोहोचणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता निघून त्याच मार्गाने बिदरला 16 रोजी पहाटे 5 वाजता पोहोचणार आहे. पंढरपूर ला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने ही विशेष सोय केल्यामुळे सीमा भागातील वारकरी बांधवाची सोय झाली असून याचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून ही रेल्वे विना आरक्षित असून रेल्वे स्थानकात सामान्य दरातील तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. ही रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे रेल्वे संघर्ष समितीने आभार मानले आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी