लातूर येथील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा इतरत्र हलवू नये : उदगीर लिंगायत समाजाची मागणी उदगीर : लातूर येथील रिंगरोड वर असलेला महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा राष्ट्रीय महामार्ग होत असल्याने इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे लक्षात आल्याने उदगीर येथील महात्मा बसवेश्वर लिंगायत सेवाभावी मंडळाच्या वतीने प्रशासनास निवेदन देऊन सदरील पुतळा इतरत्र हलवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. जर पुतळा इतरत्र हलविल्यास लिंगायत समाजाकडून आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत पुतळा आहे तेथेच ठेवून प्रशासनाने मार्ग काढावा असेही निवेदनात म्हटले आहे. आंदोलनामुळे सामाजिक भावनेचा उद्रेक होऊन परिस्थिती बिघडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनात उदगीर येथील महात्मा बसवेश्वर लिंगायत सेवाभावी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील भोपणीकर, उपाध्यक्ष बाबुराव पांढरे, कोषाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांच्यासह सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
