उदगीर करानो सावधान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पहिला मृत्यू उदगीरात! = कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मृत्यू ही उदगीर झाला होता उदगीर : कोरोनाच्या भयानक संकटानंतर जनजीवन पूर्वपदावर आलेले असतानाच राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाच्या उदगिरात एका ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच दिवसांत ग्रामीण भागातील दोघांचे आणि शहरातील एकाचा अशा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले. दरम्यान, आज तारखेत लातूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ असून ३२ गृहविलगीकरणात आहेत. एकावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरोनाच्या संकटानंतर नागरिक थोडी उसंत घेत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शासन व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उदगीर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दि. १४ एप्रिल रोजी हृदयरोग व अन्य आजाराने त्रस्त असलेला एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने त्या रुग्णाची कोरोना तपासणी करण्याकरिता त्याचे नमुने मुंबई येथील थायरोकेअर लॅब मध्ये पाठविले होते. दरम्यान दि. १५ एप्रिल रोजी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी असलेल्या त्या ६६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (दि. १८) त्या मयत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे. या घटनेनंतर उदगीर येथील आरोग्य विभाग सतर्क झाला असून त्या मयत रुग्णाच्या कुटुंबीयांची मंगळवारी येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. पाच दिवसांच्या तपासणीमध्ये तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यात देवर्जन आणि पेठेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर तिसरा रुग्ण हा उदगीर शहरातील आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लातूर जिल्ह्यातील पहिला रुग्ण उदगिरात आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांचा बळी गेलेला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळचे नातलग गमावलेले आहेत. कोरोना संकटाचा काळ हळूहळू मागे लोटला जाऊन जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी