उदगीरचा राज्यस्तरीय युवक महोत्सव न भूतो न भविष्यती होणार:- क्रिडा युवक संचालनाचे उपसंचालक युवराज नाईक 👉क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन उदगीर : क्रीडा व युवक सेवा संचलनालय व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र युवा राज्य महोत्सव दि.29 ते 31 डिसेंबर रोजी, तालुका क्रीडा संकुल उदगीर येथे होणार असून हे युवा महोत्सव भूतो न भविष्यती होणार असून हा युवा महोत्सव प्रथमच ग्रामीण भागात होत असल्याचे क्रिडा व युवक संचालनालयाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यामध्ये युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या वतीने12 ते 16 जानेवारी या कालावधीत 'राष्ट्रीय युवा महोत्सव' आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्याचे प्रातिनिधिक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव घेण्याचा बहुमान उदगीर शहराला मिळाला असुन आपल्या उदगीर शहरात दि. 29 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद मैदान), उदगीर येथे या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील नामवंत खेळाडु, कलाकार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत केंद्र शासनाच्यावतीने 12 ते 16 जानेवारी, 2024 या कालावधीत पुणे येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सन 2023-24 या वर्षातील राज्यस्तर युवा महोत्सव आयोजनाची संधी लातूर जिल्ह्यास उपलब्ध करुन दिली असून आयोजन समितीच्या वतीने 'राज्यस्तरीय युवा महोत्सव' दि. 29 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत आपल्या उदगीर शहरामध्ये आयोजित करण्यात आल्याने या शहराचे नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोप-यात गाजणार आहे. असे महोत्सव मोठ्या शहरात होत असतात मात्र या भागाचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने उदगीर शहरात पहिल्यादांच 'राज्यस्तरीय युवा महोत्सव' आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे यांनी सांगितले. या महोत्सवात जवळपास 13 समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व फोटोग्राफी, महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञानातून तृणधान्य वाढीसाठी विकास व समाज्यासाठी विज्ञान या संकल्पनेवर होणार आहेत. हस्तकला, वस्त्रोद्योग, अग्रो प्रोडक्ट अशा प्रकारामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या आठ विभागातून सुमारे 800 कलाकार सहभागी होतील. महोत्सवातील विविध बाबींच्या परीक्षणासाठी राज्यभरातून तज्ञ कलावंतांना पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय लातूरच्या वतीने महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती गठीत केलेली असून समितीच्या वतीने राज्यातील नामवंत निवडक कलाकारांना निमंत्रीत करुन महोत्सवाचे नेटके आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आयोजन समितीने महोत्सवाचा लोगो, थीम सॉंग. नाविन्यपूर्ण बाबी केलेल्या आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उदगीर शहरातील सर्व नागरीकांना 29, 30 व 31 डिसेंबर या कालावधीत लोककलेची मेजवाणी उपलब्ध होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
