तर लातूरचा पुढचा खासदार मीच :- रघुनाथ बनसोडे 👉सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला बिनविरोध निवडून द्यावे : उदगीर : लातूर राखीव लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी मतदार संघाबाहेरचा उमेदवार मतदारांवर न लादता आपण मागच्या तीन दशकांपासून आपण लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने आपल्याला सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे यांनी शुक्रवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले. लातूर लोकसभा मतदार संघ आरक्षित झाल्यापासून या मतदार संघाचा विकास ठप्प झाला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार न देता पैसेवाले, कंत्राटदार उमेदवार मतदारांच्या माथी मारण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. यापुढील काळात तरी असे प्रकार घडता कामा नये याकरिता आपण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून रघुनाथ बनसोडे पुढे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार या मतदार संघासाठी निवडून देणे आवश्यक आहे. या मतदार संघातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक कामाच्या शोधासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी आजचे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळवून देणाऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करताना दिसतात. बाहेरच्या उमेदवाराला झोपेतून उठवून आणून सामान्य मतदारांवर लादण्याचे काम यापुढील काळात होता कामा नये, अशी सामान्य मतदारांची भावना झालेली आहे. सामान्यांच्या मनातील ही खदखद आपण व्यक्त करत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. आपण सामाजिक तसेच प्रसार माध्यमातही कार्यरत आहोत. निवडणुका आल्या की प्रमुख राजकीय पक्षांना पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते दिसत नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांकडे अमाप पैसे नसल्याने नेत्यांकडूनच उमेदवारीबाबत त्यांच्यावर अन्याय का ? असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून यावेळी उमेदवारी देताना मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करू शकणाऱ्या, सामान्यांच्या प्रश्नांची नाळ ओळखून चालणाऱ्या आपल्यासारख्या तळमळीने सामान्यांसाठी कार्य करू शकणाऱ्या व्यक्तिमत्वाला उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील रहावे . पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना आपण पत्रकार बांधवांनाही किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचा जवळून अभ्यास केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या या क्षेत्राच्याही ज्या महत्वपूर्ण समस्या आहेत, त्याची सोडवणूकही आपण आपल्याला संधी मिळाल्यास करण्यास कटिबद्ध आहोत. लातूरकरांनी आपल्यावर अलोट प्रेम केले आहे. १९९६ व २००६ च्या नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी मला एक पैसाही खर्च न करता निवडून दिले होते. सामान्य लोकांसाठी मी अहोरात्र कार्य करणारा कार्यकर्ता आहे. भारतीय संविधानाला अनुसरून काम करणाऱ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आपल्याला बिनविरोध लोकसभेवर निवडून द्यावे,अशी अपेक्षाही रघुनाथ बनसोडे यांनी व्यक्त केली .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
