*लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी लातूर प्रशासन सज्ज; मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई* 👉 सकाळी आठपासून मतमोजणीने होणार सुरुवात 👉 ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी 14 टेबल . *अशा राहतील मतमोजणी फेऱ्या* उदगीर=मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फेऱ्यामध्ये सर्वाधिक 28 मतमोजणी फेऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात होतील. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 27, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 26, निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 25 आणि उदगीर व लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रत्येकी 24 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीची 1 फेरी होणार आहे. एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मतदान यंत्रातील मतमोजणीच्या 28 आणि टपाली मतमोजणीची 1 फेरी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल. मतदान यंत्रावरील प्रत्येक फेरीला अंदाजे 20 मिनिटे ते 30 मिनिटे लागण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक फेरीचा उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी याठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या पूर्वेकडील बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच जनतेसाठी मतमोजणी केंद्राबाहेरील ध्वनिक्षेपकाद्वारे फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती दिली जाणार आहे. *मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून येण्यास मनाई* मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास मनाई करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. *मतमोजणी केंद्र परिसरात तगडा बंदोबस्त* मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. केंद्रीय राखील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि लातूर जिल्हा पोलीस आणि गृहरक्षक दलातील जवानांचा यामध्ये समावेश राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वात 6 पोलीस उपाधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 48 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 460 पोलीस जवान, दंगा विरोधी दलाच्या 3 तुकड्या, शीघ्र कृती दलाची 1 तुकडी, गृहरक्षक दलाचे 300 जवान यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. *मतमोजणी केंदाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू* लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून, 2024 रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड, लातूर येथे सकाळी 8 पासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
