राजस्थान मल्टिस्टेटच्या लातुरातील अकरा सल्लागारांचा जामीन फेटाळला 👉सर्व धन दांडगे,गांधी चौक पोलीस अटक करणार का? उदगीर: ठेवीवर अवाढव्य व्याज देऊन अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेल्या परळी येथे मुख्य शाखा असलेल्या राजस्थान मल्टिस्टेट पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ३०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. लातूर जिल्ह्यातीलही शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने लातूर येथील ११ सल्लागार संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्या संचालकांमध्ये लातुरातील नामवंतांचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपूर्वी परळी येथील चंदूलाल बियाणी यांनी राजस्थान मल्टिस्टेट पतसंस्थेची सुरुवात केली. पतसंस्थेचे नाव होण्यासाठी सुरुवातीच्या काळात या पतसंस्थेने ठेवीदारांना ठेवींवर ११ ते १२ टक्के व्याज देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीतच या पतसंस्थेच्या महाराष्ट्रासह परराज्यातही ४१ शाखा सुरू करण्यात आल्या. या पतसंस्थेच्या व्याजामुळे अनेक सेवानिवृत्तांनी निवृत्तीनंतर आलेले सर्व पैसे याच पतसंस्थेकडे गुंतविले. परंतु, परळीच्या मुख्य शाखेलाच पोलिसांनी सील केले आहे. यामुळे हजारो गुंतवणूकदारांची पाचावर धारण बसली आहे. पतसंस्थेच्या शाखांमध्ये जाऊनही गुंतवणूकदारांच्या रकमा मिळत नसल्याने नरेंद्र अगरवाल यांनी लातूरचे सल्लागार संचालक असलेल्या अकरा जणांविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सल्लागार सत्यनारायण पन्नालालजी लड्डा, गोकुळदास मदनलाल चांडक, बालकिशन पांडुरंग मुंदडा, गंगाधर जवाहरलाल धूत, गोविंद गोपालदास कोठारी, कमलाकर राजाराम कुलकर्णी, बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा, पांडुरंग मथुरालाल कचोलिया, गोविंदलाल लक्ष्मीनारायण पारीख, ओमप्रकाश कन्हैय्यालाल मुंदडा आणि सत्यनारायण बन्सीलाल हेड्डा या अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी लातूर येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, असे येथील जिल्हा न्यायालयाचे सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सांगितले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी