उदगीर- जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या : सुधाकर भालेराव उदगीर= उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठका, संवाद दौऱ्यांमधून मतदारसंघ पिंजून काढला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना केलेल्या शाश्वत विकासाच्या आधारावर राज्यातील महायुती सरकारला सत्तेवरून पायउतार करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार सुधाकर संग्राम भालेराव यांनी 2009 ते 2019 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उदगीर जळकोट तालुक्यातील जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग, नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून तब्बल 60 किलोमीटर अंतरावरून उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला, नगरोत्थान विकास योजनेतून उदगीर शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठी 77 कोटी रुपये मंजूर करून दिले, मौजे डोंगर कोणाळी साठवण तलावासाठी 21 कोटी रुपये, चोंडी साठवण तलवासाठी 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील रेल्वे गेट मुळे ऑक्सफर्ड वाहतुकीची समस्या तब्बल 15 कोटी रुपयांच्या उडान पुलामुळे मिटली आहे. तसेच बिदर रोडवरील उडान पुलासाठी 24 कोटी रुपयांचा निधी माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणला आहे. परंतु मागील पाच वर्षात उदगीर विधानसभेच्या शाश्वत विकासाचा गाडा थांबला असून तो पुन्हा गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्याचे आव्हान सुधाकर भालेराव यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
