लातूर जिल्ह्यातील 25 हजार 136 लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द! उदगीर= राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता. लातूर जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक महिलांना योजनेचा निधीही मिळाला. पण, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींना महिन्यासाठी दीड हजार रुपये कधी खात्यामध्ये पडणार याची उत्सुकता सातत्याने असते. आतापर्यंत 7 महिन्यांचे दीड हजार प्रमाणे पैसेही खात्यावर जमा झाले आहेत. पण काही ठिकाणी अनियमिता आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. तर काही अर्जामध्ये कागदपत्रांची पूर्तताच झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 25 हजार 136 अर्ज हे रद्द करण्यात आल्याचे जिल्हा परिषद विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये खोटी कागदपत्रे सादर करणे, उत्पन्न जास्त असणे यासारख्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी