मी भाजप सोबतच, पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करणार - माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे उदगीर = भारतीय जनता पक्षाकडे आपण उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी आपल्याला मिळाली नाही. दरम्यान पक्ष पुन्हा विचार करू शकेल, या धोरणाने आपण भारतीय जनता पक्षाच्या नावाने एक आणि अपक्ष एक, अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे आणि लातूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रमुख आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश आप्पा कराड, आ. संभाजी भैय्या निलंगेकर, माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर या सर्वांनी विनंती केल्यावर आपण अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज परत घेत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नेते राजेश्वर नीटुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे. आपण भारतीय जनता पक्षाचाच घटक असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, उदगीर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. या विचाराने पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. राजेश्वर निटूरे हे उदगीरच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ असल्याने आणि उदगीर नगर परिषदेवर तब्बल सात वेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपला कारभार उदगीरकरांना दाखवून दिलेला असल्याने, जर ते अपक्ष उमेदवार राहिले असते तर राजकीय गणिते बिघडू शकले असती, या विचाराने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची विनंती केली, आणि ती विनंती त्यांनी मान्य करून उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्याबद्दल महायुतीचे नेते आ. संजय बनसोडे यांनी राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त केले असून, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उदगीरकरांना केले आहे. उदगीर शहरांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यापेक्षा जास्त बहुमत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती सचिन हुडे यांना मिळावे. अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजयी व्हावेत. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन हुडे यांनी देखील भाजपचे नेते राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त करून सर्व उमेदवाराना विजयी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपचे माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. राजेश्वर निटुरे यांच्या उमेदवारी परत घेण्याने, तसेच आपण भारतीय जनता पक्षासोबतच आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
